येवला येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. राष्ट्रीय वयोश्री योजना आणि केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत ९८० लाभार्थ्यांना विविध उपकरणे देण्यात आली.
यामध्ये व्हीलचेअर, श्रवणयंत्र, काठी, कुबडी, वॉकर, कमोड चेअर तसेच दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक सायकलचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ७०० दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना समान हक्क, समान संधी आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यात आले असून, येवला उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी महिन्यातून एकदा शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे, तर समान हक्क, संधी आणि सन्मानाची गरज आहे,’ असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
