मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीच्या ओसरगाव येथील टोल नाका उद्या, १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफी मिळणार की टोल भरावा लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ओसरगाव टोल नाक्यावर टोलवसुली सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमाफी मिळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
यापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमाफी देण्यात येईल आणि त्यासाठी स्वतंत्र लेन असेल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष टोल नाका सुरू होताना सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, टोलविरोधी कृती समितीही आक्रमक असून, उद्या स्थानिकांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडेही लक्ष असणार आहे.
