नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा शेतीपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. शेती वाचविण्यासाठी जनजागृती करणारा आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे.

मंडळाचे यंदा २३वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाची गणरायाची सुबक मूर्ती तांदूळ, गहू, ज्वारी, मका, बाजरी आणि वरई अशा विविध धान्यांपासून साकारण्यात आली आहे. देखाव्यात पारंपरिक शेती, विविध पिके आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व दाखविण्यात आले आहे. रासायनिक शेतीमुळे माती आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.

शेतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण व्हावा आणि सेंद्रिय तसेच पर्यावरणपूरक शेतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष राज चोरट यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अनोखा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *