नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेले ASI पी. एन. पाटील यांनी रबाळे एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तसेच सुसाईड नोट लिहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे.
व्हिडिओमध्ये पाटील यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला असून, तत्कालीन डीसीपी संजयकुमार पाटील, वायरलेस एसीपी गिरीश ठाकरे आणि स्थापना विभागातील हेड क्लर्क जयु अहिरे यांना जबाबदार धरल्याचं म्हटलं आहे.
एक ते आठ पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहिल्याचाही दावा त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे. तसंच न्यायालय आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्याय देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सुसाईड नोट, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या आरोपांमध्ये तथ्य काय आणि पुढील कारवाई काय होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
