नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या खोदकामाविरोधात उद्धवसेनेकडून आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

शालिमार चौकातून राजीव गांधी भवनपर्यंत हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नाशिककर सहभागी होणार आहेत.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप उद्धवसेनेकडून करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी विविध भागांत सुरू असलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

खड्ड्यांमुळे आतापर्यंत नाशिकमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि प्रशासनाला रस्त्यांच्या दुरवस्थेवर जाब विचारला जाणार असून, नाशिककरांच्या प्रश्नांसाठी उद्धवसेना आक्रमक भूमिका घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *