गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीपिकांसह शेतघरांचे मोठे नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वनविभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

हत्तींच्या कळपामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच हत्तींच्या कळपाला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने हलवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उपवनसंरक्षक वडसा कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ नरोटे आणि तालुकाध्यक्ष पिंकूभाऊ बावणे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

ग्रामस्थांना हत्तींच्या हालचालींबाबत नियमित माहिती आणि मार्गदर्शन देण्यासोबतच भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी आहे. उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कारभाराबाबत करण्यात आलेल्या निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *