बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची असल्याची माहिती समोर आली असून, मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
१४ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मोबाईल तपासल्यानंतर तिचा आईसोबत काहीतरी वाद झाल्याचे समोर आले. रागाच्या भरात मुलगी घरातून निघून गेल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला.
दरम्यान, रात्री ८ वाजता मुलगी पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जिन्याचा दरवाजा आतून लॉक असल्याचे आढळले. शरीरावर प्राथमिकदृष्ट्या सामान्य स्वरूपाच्या जखमा असल्याची माहिती आहे. शवविच्छेदन अद्याप झालेले नसून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मुलीने स्वतःहून उडी मारली का, याचाही तपास सुरू आहे.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून, कौटुंबिक वादाबाबतही तपास सुरू आहे. सीडीआर मिळण्यासाठी काही वेळ लागणार आहे. प्राथमिक माहितीनुसार मुलीकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. ती आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत असल्याची माहिती असून, संबंधित संशयित मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. बारामतीत गुन्हेगारी वाढलेली नसली, तरी कौटुंबिक स्वरूपाचे गुन्हे वाढल्याचे निरीक्षण असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितले.
