उमरखेडमध्ये तडीपार आरोपी राजरतन उर्फ चिंटया बापुराव इंगोले याला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. उमरखेड डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे.

२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खरूस येथील विनोद किसन वाढवे हे आकाश बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होते. ऑर्डर देण्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील तडीपार आरोपी राजरतन उर्फ चिंटया इंगोले, रा. विडूळ, ता. उमरखेड आणि त्याचा साथीदार संजय प्रताप तलवरे, रा. उमरखेड यांनी विनोद वाढवे यांच्याशी शिवीगाळ व दमदाटी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद देण्यात आली.

याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अप.क्र. ८११/२०२६, कलम १०९(१) व इतर बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपी तडीपार असल्याने त्याला तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.

आरोपी तडीपार असतानाही उमरखेड शहरात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री करून सापळा कारवाई करत राजरतन उर्फ चिंटया बापुराव इंगोले, वय ३० वर्षे, रा. विडूळ, ता. उमरखेड आणि संजय प्रताप तलवरे, वय ४५ वर्षे, रा. उमरखेड यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कायंदेपाटील आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार अतुल तांगडे, चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ वॉस्टर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *