यावल तालुक्यातील दहिगाव येथे गटारीच्या बांधकामावर गेल्या एक महिन्यापासून धापे टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने काम सुरू करण्याची मागणी होत आहे.
दहिगाव येथील सावखेडा सिम रस्त्यापासून सुरेश आबा तोल काटा ते विरावली रस्त्यावरील गटारीचे बांधकाम गेल्या महिनाभरापासून रखडले आहे. प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने ग्रामस्थांना गोडाऊन किंवा घरी जाण्यासाठी लांबचा मार्ग वापरावा लागत आहे.
ठेकेदार आणि सुपरवायझर यांनी आठवडाभरात गटारीवर धापे टाकून दुसरीकडील काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिनाभर उलटूनही काम सुरू न झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सूचना देऊन काम तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याबाबत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
