उमरखेडमध्ये ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या दोन तक्रारदारांना तब्बल ८२ हजार १०१ रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर पथकाच्या कारवाईमुळे दोन्ही तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अकोली येथील संतोष माधवराव कदम यांची २६ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने ५६ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी याबाबत पोर्टलवर तक्रार नोंदविली. तर दुसऱ्या तक्रारीत मरसूळ येथील प्रकाश सुरोशे यांची १२ जून रोजी २६ हजार १०१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. या प्रकरणातही उमरखेड पोलिसांनी सायबर यंत्रणेच्या माध्यमातून तत्काळ कार्यवाही करून फसवणुकीत गेलेली संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. अशाप्रकारे दोन्ही तक्रारदारांना एकूण ८२ हजार १०१ रुपये परत मिळाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस सहाय्यक अधीक्षक गौरव कायंदे आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, चंदन जाधव, विष्णू राठोड, संघशील टेंबरे, दिगंबर गीते आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *