- मारहाण करून मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद
- झारखंडसह बिहार आणि नागपूरचे आरोपी ताब्यात
- चोरीचे तब्बल १० मोबाईल जप्त
- स्विफ्ट डिझायर कारही पोलिसांनी केली जप्त
- एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
- उमरखेड डी.बी. पथकाची प्रशंसनीय कामगिरी
YAVATMAL | उमरखेडमध्ये मारहाण करून जबरीने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला डी.बी. पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचे १० मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडच्या गेटवर सेवानिवृत्त इंजिनियर विठ्ठल नागोराव मोहकर, वय ६४ वर्षे, रा. दयानंद कॉलनी, उमरखेड हे उभे असताना तीन अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमधून आले. त्यांनी फिर्यादीचे हात पकडून एकाने गालावर थप्पड मारली आणि खिशातील विवो कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने चोरून नेला. याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८९१/२०२६, कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि उमरखेड आठवडी बाजारातील वारंवार होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेख तालीम शेख आयुब, वय २८, रा. डाकबंगला मोतीझरना, जि. साहेबगंज, झारखंड; मकसूद आलम इदवाह आलम, वय २१, रा. नासिरगंज पुरब टोला, जि. कटिहार, बिहार; आणि वसीम अक्रम शेख अब्दुल रज्जाक शेख, वय ३२, रा. तोहीदनगर बडा माजगाव, अयोध्यानगर, नागपूर यांना एम.एच. ३६ नागपूर-तुळजापूर हायवेवरील मार्लेगाव फाटा, ता. उमरखेड येथून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून फिर्यादीच्या मोबाईलसह चोरीचे एकूण १० मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एम.एच.४९/सी.एस. २४४५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कार्यदेपाटील आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार अतुल तांगडे, चंदन जाधव, गिरीष बेंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर आणि हनुमंत मुसळे यांनी यशस्वीपणे पार पाडली. तसेच अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार आणि पोलीस हवालदार विशाल भगत यांनी मदत केली.
एनटीव्ही न्यूज मराठी | यवतमाळ
