अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दोन ठिकाणी छापे टाकत 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार सुनील पवार, अरुण गांगुर्डे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे आणि सतीष भवर यांचे पथक तयार केले.
17 आणि 18 सप्टेंबर 2026 रोजी पथकाने राहाता आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकले.
राहाता गु.र.नं. 385/2026, बीएनएस कलम 303(2), 3(5) अंतर्गत विशाल संजय जोगदंड, वय 35, रा. पुणतांबा बाजारतळ, शिर्डी आणि रामनाथ हरीभाऊ शिंदे, वय 30, रा. लुटे वस्ती, पिंपळवाडी रोड, शिर्डी यांना ताब्यात घेण्यात आले. तर स्वप्नील गोंदकर, पूर्ण नाव माहित नाही, रा. शिर्डी, हा फरार आहे. या कारवाईत 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर कोपरगाव तालुका गु.र.नं. 424/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत आकाश दशरथ पगारे, वय 23, रा. कोपरगाव खडकी, ता. कोपरगाव याला ताब्यात घेण्यात आले. विशाल लोंढे, पूर्ण नाव माहित नाही, रा. सिन्नर, जि. नाशिक, हा फरार आहे. या कारवाईतही 15 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी केली.
