यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता बेरोजगार युवकांसाठी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांकडून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना त्याचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, आस्थापना, सहकारी संस्था, बँका तसेच वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना त्याचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार निवड समितीचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी दिली.

बेरोजगार युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे आणि विविध रोजगार क्षेत्रांची माहिती मिळावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक युवकांनी २९ सप्टेंबर रोजी जे. डी. एम. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य पी. बी. पाटील आणि प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *