यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २६ सप्टेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, प्रयोगशीलता तसेच पर्यावरण आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनासाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे दोन गट करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी जलसंकलन, जलउपयोग, जलपुनर्वापर, जलसंवर्धन, अन्न, कृषी व आरोग्य तसेच शाश्वतेसाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा वापर या विषयांवर विविध प्रयोग आणि विज्ञान प्रतिकृती सादर केल्या.
शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन आणि इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षिका गौरी भिरूड आणि राजश्री लोखंडे यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले. गायत्री चौधरी, प्राजक्ता वाणी, माधुरी भारंबे आणि संस्कृती फेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना निरीक्षण, संशोधन, प्रयोगशीलता, समस्या-निराकरण आणि सादरीकरण कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
