यावलमध्ये भारतीय जनता पक्ष यावल मंडळ महिला मोर्चा पूर्व मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय जनता पक्ष यावल मंडळ महिला मोर्चा पूर्व मंडळाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा भाव, समर्पण आणि जनसेवेच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत ठिकठिकाणी सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत भाजपा जिल्हा पूर्व चिटणीस मेघा विजय कासार, यावल, जिल्हा पूर्व चिटणीस ज्ञानेश्वरी महाजन, राजोरा, ता. अध्यक्ष मंडळ रंजना पाटील, यावल, जिल्हा पूर्व सोशल मीडिया संयोजिका सरला राजेश कवडीवाले, यावल, नगरसेविका शुभांगी येवले, यावल आणि नगरसेविका सविता नन्नवरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
अंगणवाडी केंद्र हे गाव आणि शहर पातळीवर महिला व बालकांसाठी महत्त्वाचे सरकारी केंद्र आहे. ICDS संकल्पनेतून कमी खर्चात, स्थानिक साधनांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुलांची देखभाल व विकासाचे काम करतात.
अंगणवाडी केंद्रातून ० ते ६ वर्षांखालील मुले, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी पूरक पोषण आहार, पूर्व-प्राथमिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा दिल्या जातात.
तसेच ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’, महाराष्ट्रातील लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री, ‘सही पोषण-देश रोशन’ यांसारख्या उपक्रमांबाबतही माहिती देण्यात आली. बालविवाह रोखणे आणि त्याबाबत तक्रार करण्याची कायदेशीर जबाबदारीही अंगणवाडी सेविकेवर असल्याचे नमूद करण्यात आले.
