यावल तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रशांत भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
यावल तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक अनेक अडचणींना सामोरे जात असून, त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्यांमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करणे, बागायतदार शेतकऱ्यांना १ लाख रुपये आर्थिक मदत देणे, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये सरसकट मदत देणे, शेतकरी कर्जमाफी योजना तातडीने लागू करणे आणि १ रुपयाची पीक विमा योजना पुन्हा सुरू करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच घोटाळेबाज ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, SIR मधील जाचक अटी रद्द करणे आणि जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रशांत पाटील, सुनील पाटील, आनंद बोरसे, गफ्फार सोनार, दीपक पुढे, शरद पाटील, सागर पाटील आणि अनिल नबाब यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
