आजच्या काळात लग्नसमारंभ म्हटले की मोठा खर्च आणि थाटामाट दिसून येतो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह लावण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला. जुन्या चालीरीतींना बाजूला ठेवत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रावेर येथील स्वर्गीय शेख सलीम शेख जैनुद्दीन यांचे पुत्र तसेच अमीन जनाब आणि शेख चाँद यांचे पुतणे शेख अजहरुद्दीन यांचा साखरपुडा चोपडा येथील शेख असलम यांची कन्या मुनिझा कौसर यांच्याशी दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आला होता.
साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना वरपक्ष आणि वधूपक्षातील मान्यवरांनी आपापसांत चर्चा केली. जुन्या चालीरीतींना बाजूला ठेवून साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह लावण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. त्यानुसार साखरपुड्यातच विवाह सोहळा पार पडला.
आजच्या काळात विवाह समारंभांवर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र, या विवाह सोहळ्यात साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडत अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत असून, नवदाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या शुभप्रसंगी रावेरचे माजी नगराध्यक्ष मोहंमद जफर मोहंमद, अमीन जनाब, चाँद शेख, आरीफ जनाब, शोएब शेख, डॉ. अल्तमश शेख, रेहान शेख, शेख अनीस मोहंमद, वसीम खान, अजीमुल्ला खान, मतीन शेख, सैयद सादीक, मोहंमद झीशान शेख, शेख साजिद, सैयद अय्युब भाई, हाफिजुल्ला मास्टर साहब, शेख असलम, शेख जब्बार, शेख गफ्फार, हाजी मुख्तार खान साहेब, शेख जफर, सिराज खान, निसार खान, मलिक जुबेर, अमनोद्दिन सर, गफार शेख, जब्बार शेख, रफिक शेख, हाजी यासीन मलिक, इम्रान शेख, रईस शेख आणि सुलतान मलिक यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
तसेच शिक्षण व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष जाफर पठाण यांची ही भाची असल्याची माहिती देण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
