मालकापुरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
बुलढाणा : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांचं निलंबनाविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहावयास मिळाले. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदना द्वारे निलंबन रद्द करण्याची मागणी केली केली तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला.