तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले दहा रुपयांचे नाणे नाकारणे कंडक्टरला पडले महाग, ग्राहक आयोगाने ठोठावला ८ हजारांचा दंड.

सचिन बिद्री:उस्मानाबाद

उस्मानाबाद : तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले 10 रुपयांचे नाणे (10 Rs Coin)  नाकारून प्रवाशाला वाईट वागणूक दिल्याप्रकरणी उस्मानबाद ग्राहक आयोगाने (Osmanabad consumer court) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोच्या एसटी कंडक्टरला (St Conductor)  आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे दहा रुपयांचे नाणे नाकारणाऱ्या व्यापाऱ्यांनाही धडा मिळाला आहे.यामुळे दैनंदिन व्यवहारात दहा रुपयांची नाणे नाकारणाऱ्यांना सदर निकालामुळे जणू चपराक बसली आहे.

अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश

अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद २२ मे २०१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजन्याच्या सुमारास बार्शी डेपोच्या गाडीने वैराग ते उस्मानाबाद येण्यासाठी एसटीतून (एमएच20डी 8169) प्रवास करीत होते. बसचे कंडक्टर बी.वाय.काकडे यांनी प्रवाशी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांना तिकीट काढण्यासाठी रकमेची मागणी केली.त्यावेळी दिव्यांग अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवून १० रूपयाचे एक नाणे व ५ रूपयाचे एक नाणे कंडक्टर यांना दिले. यावेळी कंडक्टर काकडे यांनी १० रूपयाचे नाणे चालत नाही असे सांगितले. संबंधित कंडक्टर यांनी १० रूपये नाणे नाकारले. त्याबद्दल अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी उस्मानाबाद ग्राहक आयोगाकडे कंडक्टर काकडे व बार्शी डेपोविरूध्द तक्रार दाखल केली.अर्जदाराच्या वतीने अँड महेंद्र एम सोनवणे यांनी युक्तिवाद केला.तो युक्तिवाद ग्राह्य धरून उस्मानाबाद ग्राहक आयोगाने आदेश पारित करीत संबंधित एस टी कंडक्टरविरुद्ध निकाल दिला आहे. त्यात अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *