गोंदिया : गरिबांचे अश्रू पुसणारा… त्यांच्या मदतीला धावून जाणारा….त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहणारा….अशी ओळख अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची आहेच. याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आला. असेच सत्कार्य त्यांच्या हातून बुधवारी (ता. ७) येथे घडले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील मुले आहेत, त्यांच्या पायात जुते (शूज) नाहीत. कोणी अनवानीच शाळेत येतात, अशी माहिती त्यांना गणेश मंडळाच्या सदस्यांकडून मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा परिषदेची शाळा गाठली. परिस्थिती ओळखली आणि विद्यार्थ्याकरिता जुते (शूज) उपलब्ध करून दिले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.
ओवीत म्हणतात….
जे का रंजले गांजले!
त्यासी म्हणे जो आपुले!
तोची साधू ओळखावा!
देव तेथेची जाणावा!
अप्पर जिल्हाधिकारी राजेश हे बुधवारी काही शासकीय कामानिमित्त आमगाव येथे आले होते. येथील काही गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत केले होते. त्या शिबीराला त्यानीं भेट दिली. त्यावेळी एका गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी सांगितले की, आमच्या मंडळाकडून गरीब विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप केले जाते. शाळेतील काही मुले अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. अनेकांना पायात घालायला जुते (शूज) नाहीत. त्यामुळे सहज म्हणून अप्पर जिल्हाधिकारी खवले यांनी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट दिली आणि खरोखरच अनेक मुलांच्या पायामध्ये रबरी स्लीपर असल्याचे दिसून आले. काहींच्या पायात तर ते देखील नव्हते. लगेचच त्यांनी फोनवरून काही अधिकारी मित्रांशी चर्चा केली आणि त्या मुलांना जुते (शुज) देण्याचा निर्णय घेतला.
गावातीलएका शूज विक्रेत्याला बोलावून तातडीने शूज उपलब्ध करून घेतले आणि मुलानां शूज वितरीत करण्यात आले. शुज मिळाल्यानंतर मुलांच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. यावेळी नायब तहसीलदार गुनवंत भुजाडे, तलाठी प्रविण चव्हान , मुख्याध्यापिका मच्छिरके तसेच अधिकारी – कर्मचारी व शाळेतील शिक्षक – शिक्षिका उपस्थिती होते.
प्रतिक्रीया
“आपल्याही परिसरामध्ये अशा प्रकारचे गरीब कुटुंबातील अनेक मुले, मुली असू शकतात. अगदी अल्प खर्च करून आपण या मुलांना शूज उपलब्ध करून देऊ शकतो. प्रत्येक शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जर का काही ठराविक मुलांना शूज उपलब्ध करून दिले तर फार मोठे कार्य घडू शकते. अगदी रक्कम खर्च करून आपण या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.
राजेश खवले, अप्पर जिल्हाधिकारी, गोंदिया,