अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ,अन्न पदार्थांचा समावेश…

गोंदिया : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून संशयित 11 लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात खाद्यतेल पॅकेजिंग पुनर्वापर, निकृष्ट दही पॅकेजिंग, विना लेबल गरम मसाला व लाल तिखट इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल, वनस्पती, खवा-मावा, रवा, मैदा, बेसन इत्यादी अन्न पदार्थांचा मिठाई व नमकिन बनविण्याकरिता वापर करण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यातील जनतेला सकस व निर्भेळ अन्न मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सणासुदीच्या दिवसात उत्पादक, रिपॅकर, घाऊक विक्रेते, स्वीट मार्ट यांच्या तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

गोंदिया जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या दिवसात खोवा-मावाचे दोन नमुने, मिठाईचे 13 नमुने, खाद्यतेलाचे 5 नमुने तसेच इतर अन्न पदार्थांचे (रवा, बेसन, दही, मैदा) 22 नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये खुले खाद्यतेल विक्रेते व खाद्यतेल पॅकिंग करीत टिनाच्या डब्यांचा पुनर्वापर करणारे इत्यादींवर जप्ती धाडी टाकून एकूण 1198 किलो व 01 लाख 66 हजार 122 रुपये किमतीचा माल भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. तसेच ” दही ” या अन्न पदार्थाची साठवणूक गांजलेल्या टिन मध्ये केल्याचे आढळून आले. त्यामुळे कमी दर्जा असल्याच्या संशयावरून तसेच गांजलेल्या टिन मध्ये साठवणूक केल्यामुळे ” दही” या अन्नपदार्थाचा एकूण वजन 1676 किलो व 66 हजार 640 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच कोल्ड स्टोरेज आस्थापनेवर धाड टाकून तेथे साठवणूक करून ठेवलेल्या विना लेबलच्या “गरम मसाला व लाल तिखट ” या अन्नपदार्थाचा कमी दर्जा संशयावरून व खुल्या स्वरुपात असल्याने सदरचा साठा जप्त करण्यात आला.” गरम मसाला व लाल तिखट या अन्नपदार्थांचा 11 लाख 1 हजार 280 रुपये किमतीचा 4846 किलो इतका साठा जप्त करण्यात आला.

दिवाळीच्या काळातच विभाग सक्रिय
सणासुदीच्या दिवसांचा विचार करता, खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता नाकारता येत नाही व सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खाद्यपदार्थ व मिठाई इत्यादी खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. तो विचारात घेता अन्न व औषध प्रशासन, कार्यालय तर्फे धडक मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. खुले खाद्यतेल विक्री करण्यास कायद्यानुसार मनाई आहे, तरी सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी विनालेबलच्या व विना पॅकेजिंगच्या खाद्यतेलाची विक्री करू नये, अन्यथा त्यांचेवर या प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अन्न पदार्थ खरेदी करतांना अन्न पदार्थाची उत्पादन तिथी व वापराच्या तारीखेबाबत खातरजमा करूनच योग्य गुणवत्तेचे अन्न पदार्थ खरेदी करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *