PUNE | नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर एकाचा मारहाण करुन खून केल्याचा घटना उघडकीस आली. खून झालेली व्यक्ती फिरस्ता असावी, अशी पोलिसांना शंका आहे. त्याचा खून करणार्‍याला पोलिसांनी पकडले. तोही फिरस्ता असल्याचा संशय असून तो स्वत:चे नावही सांगत नाही. त्यामुळे खून झाला, आरोपी पकडला पण दोघांचीही नावे आणि खूनामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर २२ जानेवारीला पहाटे ३ वाजून ४३ मिनिटे ते ४ वाजून २५ मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर बसलेल्या एका अंदाजे ६० वर्षाच्या ज्येष्ठाला एका ३५ ते ४० वर्षाच्या पुरुषाने काही कारण नसताना जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली पाडून तोंडावर लाथांनी मारहाण करुन जीवे ठार मारले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एकाने ज्येष्ठ नागरिकाचे भिंतीला डोके आपटल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी एकाला पकडले. खून झालेला आणि मारणारा आरोपी हे दोघेही फिरस्ते असावेत. आरोपीने अजूनपर्यंत स्वत:चेही नाव पोलिसांना सांगितलेले नाही. त्यामुळे खून झाला, आरोपी मिळाला. पण दोघेही अनोळखी अशी सध्याची तपासाची स्थिती आहे. पोलीस आरोपीकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.

#pune#punenews#murder#Murdercase#punemurder#punepolice#maharashtra#marathinews #punecity#punecrime#crime#crimenews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *