DHULE | मोबाईल हिसकावणारे दोघे मोहाडी पोलिसांच्या ताब्यातमुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रेन्सीडेन्सी समोरील रोडवर थांबून मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना मालेगाव येथून अटक करण्यात आली. तर त्यांचा तिसरा साथीदार हा फरार आहे. ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली. चक्करबर्डी रोडवरील अण्णासाहेब पाटील नगरातील हिरामण गायकवाड हे दुचाकीने अवधान एमआयडीसी येथून घराकडे येत होते. रेन्सीडेन्सी समोरुन जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन तिघे आले. त्यांनी बळजबरीने मोबाईल हिसकाविला आणि पळून गेले होते. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना संशयित मालेगाव येथे असल्याची माहिती मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथक मालेगावला रवाना झाले होते. समीर खान सलीम खान, मालेगाव आणि सैय्यद दाऊद सैय्यद इब्राहीम, मालेगाव या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. तर, त्यांचा तिसरा साथीदार हा फरार झालेला असून पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली.
