नागपूर, एनटीव्ही न्यूज मराठी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ढालगाव खैरी गावात मोठे नुकसान झाले आहे. येथील श्री. वाट यांच्या कुटुंबाचे जुने घर कोसळले असून, यात घरातील सर्व साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ढालगाव खैरी येथील श्री. वाट यांच्या घराच्या मातीच्या भिंती ओल्या होऊन कमकुवत झाल्या होत्या. याच कारणामुळे घराचे छत आणि भिंती अचानक कोसळल्या. या घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, घरातील टीव्ही, फर्निचर, लाईट, शेतीची अवजारे, तसेच इतर गृहपयोगी वस्तू आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कुटुंब उघड्यावर, शासनाकडे मदतीची मागणी
घर कोसळल्यामुळे वाट कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. त्यांचे तात्काळ घर बांधणे शक्य नाही, कारण त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाट कुटुंबाकडून केली जात आहे.
प्रतिनिधी : मंगेश उराडे, एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.