मुंबईच्या मालाड स्टेशनजवळची एक गल्ली. वेळ रात्री आठ-साडेआठची. कर्फ्यूमुळे रस्त्यावर फारशी गर्दी नाही. शंभर दोनशे लोक रांगेत उभे आहेत आणि आई-मुलाची एक जोडी त्यांना जेवण वाढतेय.
गेल्या वर्षीपासून जवळपास दररोज इथे साधारण असंच दृश्य पाहायला मिळतं. हर्ष आणि हीना मांडविया हे मायलेक आणि त्यांची टीम रोज शेकडो लोकांना जेवण वाढतात.
कोव्हिडच्या साथीनंतर पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला एक छोटासा उपक्रम ‘फीड द नीडी’ (गरजूंना खाऊ घाला) नावाची मोहीमच बनला आहे. त्यांनी गेल्या अकरा महिन्यांत 26 हजारांहून अधिक थाळ्या जेवण वाढलं आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाद्वारा निधी उभा करतात.
हीना सांगतात, “मला वाटलंही नव्हतं आम्ही इतके दिवस हे काम करत राहू. पण लोकांकडून मदत येत गेली, आम्ही जेवण वाढत राहिलो आणि अजूनही हे काम सुरू आहे.”
स्वतः हीना यांची कहाणीही संघर्षानं भरलेली आहे. एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या हीना यांनी पुढे एक यशस्वी व्यवसाय तर उभा केलाच, शिवाय त्या माध्यमातून आज त्या शेकडो लोकांचं पोट भरत आहेत.