- “मी नाराज नाही, सर्वस्व पणाला लावून सर्व उमेदवार विजयी करू” – ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी, (दि. १८ नोव्हेंबर)
अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवक उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या घोषणेनंतर, नगराध्यक्षपदाचे इच्छुक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“मी नाराज नाही” – प्रा. मधुकर राळेभात
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जामखेडचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे प्रा. मधुकर राळेभात यांना नगराध्यक्षपदासाठी भाजपने डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांत नाराजीचा सूर पसरला होता. मात्र, प्रा. राळेभात यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “मी नाराज नाही. पक्षाने दिलेला आदेश पाळणारे आम्ही आहोत. सर्व उमेदवारांचा ताकदीने प्रचार करून सर्व जागा निवडून आणू.” त्यांनी यावेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ असणारे उमेदवार भाजपने दिले असल्याचे सांगितले.
माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर आणि माजी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी पत्रकारांशी बोलताना विश्वास व्यक्त केला की, पक्ष प्रा. राळेभात यांना लवकरच उच्च पदावर जबाबदारी देईल.
प्रा. राळेभात यांचा राजकीय प्रवास
प्रा. मधुकर राळेभात यांचा जामखेडच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. २००९ साली त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. २०२४ मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम शिंदे यांच्या विरोधातील ४५ हजाराचे मताधिक्य कमी करून ६०० मतांवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपाचे प्रभागनिहाय उमेदवार
मंगळवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदाचे २४ उमेदवार जाहीर केले.
- नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार: सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी.
प्रभागनिहाय जाहीर केलेले नगरसेवक उमेदवार:
| प्रभाग क्रमांक | ‘अ’ गटातील उमेदवार | ‘ब’ गटातील उमेदवार |
| प्रभाग १ | सुमन अशोक शेळके | श्रीराम आजीनाथ डोके |
| प्रभाग २ | प्रविण विठ्ठल सानप | कमल महादेव राळेभात |
| प्रभाग ३ | पोपट दाजीराम राळेभात | सिमा रवींद्र कुलकर्णी |
| प्रभाग ४ | विकी धर्मेंद्र घायतडक | प्रांजल अमित चिंतामणी |
| प्रभाग ५ | हर्षद भाऊसाहेब काळे | लता संदिप गायकवाड |
| प्रभाग ६ | कोमल सनी सदाफुले | गुलचंद हिरामण अंधारे |
| प्रभाग ७ | नंदा प्रविण होळकर | मोहन सिताराम पवार |
| प्रभाग ८ | शोभा दिलीप वारे | युनुस दगडू शेख |
| प्रभाग ९ | वैशाली अर्जुन म्हेत्रे | तात्याराम रोहिदास पोकळे |
| प्रभाग १० | मिना हनुमंत धनवटे | आरीफ जमशीद सय्यद |
| प्रभाग ११ | संजय नारायण काशिद | आशाबाई बापू टकले |
| प्रभाग १२ | जया संतोष गव्हाळे | मोहन तुकाराम गडदे |
यावेळी पत्रकार परिषदेला प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद कार्ले, अजय काशिद, डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय काशिद, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, कांतीलाल वराट यांच्यासह अनेक पदाधिकारी व सर्व उमेदवार उपस्थित होते.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.
