नंदुरबार : कोरोना विषाणूसह त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज थेट कोळदा- खेतिया मार्गावर थांबत प्रवाश्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पाहणी करीत लसीकरण करून घेण्याचे नागरिकांना आवाहन केले.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढावे म्हणून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून तीन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेत जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह सर्वच वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले असून ते नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करीत आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह सर्वच अधिकारी गाव-पाड्यापर्यंत पोहोचले. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी आज सकाळी शहादा तालुक्यातील कोळदा- खेतिया मार्गावर थांबत वाहनांमधील प्रवाशांची तपासणी करीत लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस घेवून दुसरा डोस करीता कालावधी पूर्ण झाला असेल त्यांनी तातडीने दुसरा डोस घ्यावा. ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी डामरखेडा शिवारातील कापसाच्या शेतातील मजुरांशी संवाद साधला. त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी सुनिल माळी, नंदुरबार