• नऊ महिन्यांपासून पदभार हस्तांतरणाचा घोळ..!
  • शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित तर अधिकारी वेतनाच्या प्रतीक्षेत?

मंगरूळपीर प्रतिनिधी | दि: १८ मार्च २०२६

वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी, येडशी, चोरद या भागातील फळबाग अनुदानाचा सावळागोंधळ सुरू असतानाच, आता कृषी प्रशासनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरद या सहायक कृषी अधिकारी मुख्यालयाचा पदभार चक्क नऊ महिन्यांपासून हस्तांतरित झाला नसल्याने या क्षेत्रातील कृषी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

नऊ महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’

जुलै २०२५ मध्ये चोरद मुख्यालयी बदलीने रुजू झालेले सहायक कृषी अधिकारी पुरुषोत्तम सांगोळे हे अद्यापही अधिकृत पदभाराच्या प्रतीक्षेत आहेत.

  • अडचण काय?: सांगोळे रुजू होण्यापूर्वी शेलूबाजार येथील सहायक कृषी अधिकारी यांचेकडे या क्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र, नवीन अधिकारी येऊन नऊ महिने उलटले तरी जुन्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार सोपवलेला नाही.
  • परिणाम: चोरद, येडशी आणि जनुना खु. या तीन गावांतील शेतकरी कृषी योजना आणि मार्गदर्शनापासून वंचित आहेत. शेतकरी जेव्हा सांगोळे यांच्याकडे जातात, तेव्हा “पदभार नसल्याने मी काम करू शकत नाही” असे उत्तर मिळते, तर जुन्या अधिकारी “नवीन अधिकारी आले असल्याने माझी जबाबदारी नाही” असे सांगतात.

काम नाही, पण वेतन सुरू!

सर्वात गंभीर बाब म्हणजे, पुरुषोत्तम सांगोळे यांना अधिकृत पदभार मिळाला नसला आणि त्यांनी नऊ महिने कोणतेही क्षेत्रीय काम केले नसले, तरी त्यांचे वेतन मात्र नियमित सुरू आहे. कामकाज न करता वेतन घेणे ही प्रशासकीय नियमांची पायमल्ली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सांगोळे यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी लेखी पत्र देऊनही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रशासकीय ‘अर्थ’कारण की दुर्लक्ष?

पदभार हस्तांतरणास टाळाटाळ करण्यामागे काहीतरी ‘काळेबेरे’ असण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी या प्रकरणावर गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कृषी प्रशासनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

“शेतकरीच भरडल्या जात आहे…”

दोन महिन्यांपूर्वी लेखी पत्र देऊनही सांगोळे यांच्या विनंतीला न्याय न मिळणे, हे या प्रकरणातील संशय वाढवणारे आहे. या गोंधळात शेतकरी मात्र नाहक भरडला जात असून योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक लागला आहे.

काय म्हणतात अधिकारी?

“एवढ्या दिवसांपासून पदभार न देणे चुकीचे आहे. जरी अधिकृत पदभार सांगोळे यांच्याकडे नव्हता, तरी ते चोरद मुख्यालयाचेच काम करत होते. जर काही अनियमितता आढळली, तर ज्यांच्याकडे प्रभार होता, तेच दोषी असतील. पदभार हस्तांतरण नेमक्या कोणत्या तारखेला झाले, याविषयी मी आस्थापनेला विचारून कळवतो.” — आकाश मधुकरराव इंगोले, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, मंगरूळपीर


वृत्त संकलन: प्रतिनिधी फुलचंद भगत, मंगरूळपीर, वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *