- अवघ्या ८ साक्षीदारांच्या जोरावर शुभम चव्हाणला मरेपर्यंत कारावास; १० हजार रुपयांचा दंड

वाशिम प्रतिनिधी | दि: २६ मार्च २०२६
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील एका गंभीर खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. जुन्या वादातून रोहित पवार याची हत्या करणाऱ्या शुभम सुभाष चव्हाण याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
१० नोव्हेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे जुन्या वादातून आरोपी शुभम सुभाष चव्हाण याने रोहित कैलास पवार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाल्याने, मालेगाव पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा (कलम १०३(१) भा.न्या.सं. व अट्रॉसिटी कायदा) दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
तपास आणि ठोस पुरावे
तपास अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या या गुन्ह्याचा तपास केला:
- शस्त्र जप्ती: गुन्ह्यात वापरलेले हत्यार तातडीने जप्त करण्यात आले.
- साक्षीदार: प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तांत्रिक आणि भौतिक पुरावे गोळा करण्यात आले.
- न्यायालयीन प्रक्रिया: अमरावती येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा (C.A. Report) अहवाल आरोपीच्या विरोधात आल्याने गुन्हा सिद्ध होण्यास मोठी मदत झाली.
न्यायालयाचा निकाल
वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात (DJ-03) या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता श्रीमती माधुरी मिसर (व्यास) आणि कोर्ट पैरवी पोहवा संतोष इंगोले यांनी साक्षीदारांना योग्यरीत्या ब्रिफिंग केल्याने, सुनावणी दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी ठोस साक्ष दिली.
न्यायालयाने एकूण ८ साक्षीदारांची साक्ष आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून २४ मार्च २०२६ रोजी आरोपी शुभम चव्हाण याला आजीवन सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास) अशी शिक्षा सुनावली.
पोलीस पथकाचे यश
पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कायदेशीर लढाई लढली गेली. तपासामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मदतनीस म्हणून पोहवा आतिश काळमंधळे आणि पोशी गणेश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वृत्त संकलन: प्रतिनिधी फूलचंद भगत, वाशिम.
