AHILYANAGAR | जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संविधान चौकात एकत्र येत मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना दिली.
या जयंती सोहळ्यानिमित्त जामखेड येथील संविधान स्तंभ फुलांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आला होता. प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते भानुदास बोराटे आणि जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ पोले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून काढलेली रॅली सर्वांचे आकर्षण ठरली.
याप्रसंगी बोलताना वैजिनाथ पोले यांनी सर्वधर्मसमभाव जोपासण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला धनराज राजगुरू, सुनील जावळे, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, मंगेश आजबे, प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्यासह सागर सदाफुले, कुंडल राळेभात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक विकास बगाडे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रमात मोठी रंगत आली.
नंदू परदेशी,
जामखेड, अहिल्यानगर
