नंदुरबार : राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावांचे ड्रोनद्वारे भूमापन मोजणी सर्वेक्षणाचा शुभारंभ आज सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक स्वाती लोंढे, गट विकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, भाजपा अनुसुचित जमाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता टी.एन.वाघ, उप अधीक्षक अ.भ.ठाकूर, सहाय्यक अभियंता वासंती बोरसे, प्राचार्य दत्तात्रय सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी घोष म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण, मिळकतींचा नकाशा व सीमा निश्चित होतील. तसेच मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याचीही नोंद होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. या सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशे उपलब्ध होणार आहेत. ड्रोनद्वारे भूमापन करतांना खुल्या, मोकळ्या जागा, आणि गावातील रस्ते इतर शासकीय व सार्वजनिक मिळकतीचे हक्काबाबत बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिकांनीही सर्वेक्षणासाठी यंत्रणेला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमती लोंढे म्हणाल्या की, पहिल्या टप्प्याअंतर्गत अक्कलकुवा तालुक्याची निवड करण्यात आली असून हे सर्वेक्षण एका महिन्याच्या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात गावठाण, सरकारी मालमत्ता,ग्रामपंचायतीचे तसेच खाजगी मालमत्तेचे सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणातून अत्यंत अचूक असा डेटा उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणात ड्रोनच्या सहाय्याने अत्याधुनिक जीआयएस प्रणालीच्या आधारे गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होईल. याचा फायदा भविष्यात सर्व नागरिकांना होणार आहे. तरी या सर्वेक्षणात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी – सुनिल माळी, नंदुरबार