नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी 2021- 22 या हंगामात महाबीज सोयाबीन बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे महाबीज सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून कृषी विभागाचे सचिव तथा महाबीजचे अध्यक्ष यांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला मार्फत नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी हंगामात सोयाबीन बियाण्याचा बीजोत्पादन कार्यक्रम 960 हेक्टर क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आणि महाबीजच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, कृषी उपसंचालक व्ही.डी.चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. ई. हडपे, बी. जे. गावित, आर. एम. शिंदे, नरेंद्र महाले, रतिलाल महाल, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बी. जी. कोटकर, महाबीजचे कृषी क्षेत्र अधिकारी ए. ए. जगदाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, आगामी वर्षातील खरीप हंगामाचे आतापासूनच नियोजन केल्यास सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे बीजोत्पादनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. या उपक्रमात सहभागी होत शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी या उपक्रमात सहभागी होवू शकतील. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. कोटकर यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात सोयाबीनचे एमएयूएस- 158, 612 या वाणांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकरी शंभर रुपये शेतकऱ्यांनी जमा करून 20 डिसेंबर 2021 पर्यंत बियाणे आरक्षित करावे. बीजोत्पादन कार्यक्रमाचे संपूर्ण बियाणे महामंडळामार्फत शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी तालुक्यासाठी महाबीज शहादा गोदाममधून, तर नंदुरबार व नवापूर तालुक्यासाठी बीज प्रक्रिया केंद्र, महाबीज दोडांईचा येथे स्वीकारण्यात येईल. सोयाबिनचे कच्चे बियाणे प्राप्त झाल्यानंतर त्याचा नमुना बीज परिक्षण शाळा, अकोला येथे तपासण्यात येईल. पात्र झालेल्या लॉटला चालू बाजार भावाच्या 80 टक्के एवढी आगाऊ रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल. तसेच अंतिम पैशासाठी खरीप 2021 हंगामातील सोयाबिन बीजोत्पादकांना दिलेले अंतिम दर अधिक बोनस (बाजार समिती दरावर आधारीत महाबीज कमिटीने निश्चित केल्या प्रमाणे बिजोत्पादकांना देण्यात येतील.) अधिक माहितीसाठी सहायक क्षेत्र अधिकारी, शहादा (9763600597), सहायक क्षेत्रीय अधिकारी, दोंडाईचा (8669642792) यांच्याशी किंवा जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक बियाणे लवकरच उपलब्ध होईल. या बियाण्याची रक्कम भरुन शेतकऱ्यांनी बियाण्याची उचल करावयाची आहे. एका गावात किमान 6 हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम होणे आवश्यक आहे. बीजोत्पादन कार्यक्रम क्षेत्र नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा अर्ज, सातबारा उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुक, पॅनकार्ड इत्यादीची झेरॉक्स प्रत सादर करावी. सोयाबीन पिकाची पेरणी डिसेंबर 2021 चा शेवटचा आठवडा ते दहा जानेवारी 2022 पर्यंत करावयाची आहे. असेही श्री. कोटकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या सोयाबीन बीजोत्पादन भित्तीपत्रिकेचे अनावरण जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिनिधी – सुनिल माळी, नंदुरबार