कारंजा येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दिवानाखाली ठेवलेले १० हजार रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला कारंजा पोलिसांनी अटक केली असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१३ ऑगस्ट २०२६ रोजी खरखसखांडा येथील वामनराव महादेव वंजारी यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती पाणी मागण्याच्या बहाण्याने आला. वंजारी पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीने दिवानाखाली ठेवलेली १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान रामराव भिमराव ढोबळे, वय ५५, रा. तिवसा, जि. अमरावती याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास कारंजा पोलिसांकडून सुरू आहे.
