शिंदखेडा एसटी महामंडळाच्या कारभाराचा फटका आता थेट शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथून सुमारे ६० ते ७० विद्यार्थी शिक्षणासाठी शिंदखेडा शहरात ये-जा करतात. मात्र, शिंदखेडा आगारातून सकाळी सात वाजता चिमठाण्याकडे येणारी बस गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
बससेवा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही, तर काहींना नाइलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी सहा वाजता चिमठाणे बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
बससेवा पूर्ववत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, दोन तासांपासून आंदोलन सुरू असतानाही एसटी महामंडळाचा एकही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
