शिऊर, लातूर : गेल्या साडेतीन महिन्यांपासून उन्हाचा चटका आणि पाण्याचा भीषण दुष्काळ सहन करणाऱ्या लातूर तालुक्यातील शिऊर गावाजवळील तावरजा धरण परिसरासाठी कालची रात्र एक नवा आशेचा किरण घेऊन आली.
रात्री गौरी-लक्ष्मीच्या आगमनानंतर ठीक १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास अचानक आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पुढील एक ते दोन तास धो-धो मुसळधार पावसाने तावरजा धरणाच्या परिसरातील गावांना झोडपून काढले.
गेल्या काही दिवसांत पाऊस नसल्यामुळे हाताशी आलेले सोयाबीन आणि उडीदचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर होते. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, या एकाच रात्रीच्या पावसाने निसर्गाचे चित्रच पालटले.
अनेक दिवसांपासून पूर्णपणे कोरडी पडलेली आणि सुस्तावलेली तावरजा नदी या पावसाने पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात खळाळून वाहू लागली आहे. साडेतीन महिन्यांनंतर आलेला हा या हंगामातील सर्वात दमदार पाऊस ठरला आहे. नदीचे पात्र भरून वाहताना पाहून बळीराजा आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला आहे.
