गौरी-गणपतीचे सण सुरू असताना लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याने नागरिक आणि ग्रामस्थांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पावसाची ओढ आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चोरी, दरोडा किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी घराभोवती किंवा गल्लीत संशयित व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ सावध व्हावे. गावाला किंवा घराबाहेर जाताना दारे-खिडक्या व्यवस्थित बंद करावीत तसेच मौल्यवान वस्तू आणि रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवावी. आपल्या शेजाऱ्यांशी आणि परिसरातील नागरिकांशी उत्तम सुसंवाद ठेवून अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगी एकमेकांना मदत करावी. कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा संशय आल्यास अजिबात उशीर न करता डायल 112 वर संपर्क साधावा. तसेच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचा फोन क्रमांक 02382 246211 यावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांची सतर्कता, सावधानता आणि पोलिसांचे सहकार्य यामुळे सर्वजण सुरक्षित राहू शकतात, असे पोलिसांनी म्हटले आहे.
