नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात उपरवाही-घोगली शिवारातील मार्गावर गुरुवारी, 24 सप्टेंबर रोजी रात्री तसेच सकाळी पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली. यापूर्वीही याच मार्गावर शेतकऱ्यांना वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघ दिसल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक मंगेश गमे यांच्या टीमसह उपरवाहीच्या सरपंच स्नेहा छत्रपती बुरबुरे, दोन्ही गावांचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकानेही तातडीने परिसराची पाहणी केली. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविणे आणि गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाघ असल्याचे पुराव्यांवरून निश्चित झाल्यास नियमानुसार त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात हलविण्याची कार्यवाही केली जाईल, असे वन विभागाने सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे. वाघ दिसल्यास त्याचा पाठलाग किंवा गर्दी न करता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | कळमेश्वर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *