NAGPUR| नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या टाकळघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांना आर्थिक व्यवहारांबाबतच्या तक्रारीनंतर अपात्र ठरवण्यात आले आहे. अपर विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांनी २१ सप्टेंबर रोजी हा आदेश पारित केला.
टाकळघाट ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश नथ्युजी कावळे यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत तक्रार दाखल केली होती. यात ग्रामपंचायत निधीचा वापर, मजुरांना रोखीने मजुरी देणे, विकासकामांची देयके आणि आर्थिक नियमांचे पालन न झाल्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.
चौकशीदरम्यान विविध विकासकामांवरील मजुरांना बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याऐवजी रोखीने मजुरी दिल्याचे आदेशात नमूद आहे. तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील मजुरीची रक्कम प्रत्यक्ष मजुरांच्या नावाऐवजी निविदाधारकाच्या नावाने अदा झाल्याची बाबही नमूद करण्यात आली.
सरपंचांनी आपल्या बचावात व्यवहार ग्रामपंचायत ठरावानुसार झाल्याचे, मजुरांना प्रत्यक्ष कामाच्या आधारे मजुरी दिल्याचे आणि ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे सांगितले. मात्र, उपलब्ध अभिलेख, चौकशी अहवाल आणि नियमांचा विचार करून तक्रार अर्ज मान्य करण्यात आला.
सरपंच व सचिव यांची संयुक्त जबाबदारी असताना संगनमत करून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे निरीक्षण आदेशात नोंदवण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या चौकशी अहवालाशी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायासन सहमत झाले. त्यानंतर शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांना पुढील कालावधीसाठी ग्रामपंचायत टाकळघाटचे सदस्य व सरपंचपद धारण करण्यास अपात्र घोषित करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सचिवाविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांना देण्यात आले आहेत.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
#Nagpur #Takalgat #GramPanchayat #SharadaShingare #NagpurNews #BreakingNews #MaharashtraNews #NTVNewsMarathi #MarathiNews #GramPanchayatNews #LatestNews #NewsUpdate
