कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दोन मुली आणि दोन मुलांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत.
नुकत्याच झालेल्या स्पर्धेत आठवीतील रितेश दुधाटे याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कामगिरी केली. तर 17 वर्षांखालील मुलींच्या गटात दहावीतील आयशा सादक शेख हिने गोळाफेकीत आणि साफिया सलीम शेख हिने भालाफेकीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या भालाफेक स्पर्धेत गणेश एकनाथ मुंडे यानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती क्रीडा शिक्षक गुंडरे सर यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री बसवेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष वैजनाथराव सादलापुरे, मुख्याध्यापक बापूराव मंगनाळे, चंद्रकांत फुलवळे, पांचाळ सर, साकेत सर आणि सर्व शिक्षकांनी शाल व हार देऊन सत्कार केला. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
शेख शादुल | एनटीव्ही न्यूज मराठी | कंधार, नांदेड
