दरवर्षी वर्ष संपताना अनेक व्हाट्स ॲप ग्रूप्सवर एक मेसेज न चुकता फिरत असतो
आपल्या ग्रूपचे ॲडमिन नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी देणार!
खरंतर तो एक गमतीचा भाग असतो. कोणीही सीरिअसली घेत नाही. पण एक ग्रूप मात्र ह्याला अपवाद ठरला
बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली येथील व्हॉटसअप ग्रुप.या ग्रुपवर चिखली बुलढाणा सह मुंबई,नागपुर औरंगाबाद ,हिंगोली,अकोला सह राज्यातील विवीध भागातील सदस्य आहेत. निमित्त होतं ‘ कौन बनेगा करोडपती? ‘ ह्या कार्यक्रमात हॉट सीटवर पोहोचलेले ग्रूप मेंबर, स्टेट बॅंक ऑफ इंडिया,शाखा अमडापूर येथे कार्यरत असलेले श्री.अमितजी चोपडा ह्यांच्या सत्काराचं!

अकबराच्या नवरत्न दरबाराबद्दल आपण ऐकलंय. तशीच मौल्यवान रत्न सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातही होती. अशाच काही ‘ रत्नांचा ‘ एक ग्रूप जि. प. हायस्कूल, सावरगाव डुकरे ( सद्ध्या गणेशपूर) येथे कार्यरत श्री. भागवत उत्तमराव ( भाऊ) मोरे यांनी बनवला, कौशल्याने सांभाळला आणि वाढवला. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत, भिन्न विचारांचे आणि विविध वयोगटातील सदस्य एकत्र ठेवणारा धागा म्हणजे ‘ भाऊ’!माणसं जोडणं आणि टिकवणं ही सद्ध्याच्या ‘ ज्वालाग्राही ‘ कालखंडातील महाकठीण गोष्ट! ती भाऊंनी सहजसाध्य केली.
…. एरवी एकमेकांशी व्हाट्सॲपच्या माध्यमातून हितगुज साधणारे, दिलखुलास दाद देणारे सदस्य बहुतांशी एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले नव्हते.

आजचा दिवस उजाडला तो त्या जिव्हाळ्याला, आदराला, बंधुभावाला मूर्तरूप देण्यासाठीच! गेले काही दिवस भाऊ आणि ग्रुपमधील चिखलीकर सदस्य- रामेश्वरभाऊ दरेकर, शामभाऊ वाघ सर, राजूभाऊ खेडेकर सर, अरुणभाऊ गरूड सर , अनंत सोळंके सर- ह्यांनी मिळून ह्या स्नेहमिलन कार्यक्रमाची तयारी चालवली होती. सद्ध्याच्या व्यस्ततेच्या काळातही ह्या स्नेहमिलन सोहळ्याच्या आयोजनामागच्या उत्कट भावनेचा आदर राखण्यासाठी दूरदूरच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवणे ही या कार्यक्रमाची सर्वात मोठी उपलब्धी! ग्रूप मेंबर श्री.शरद जाधव सरांच्या माध्यमातून ग्रूपशी जोडले गेलेले हिंगोली येथील श्री. सीतारामजी देशमुख बापू लालपरीचा संप असल्यामुळे चक्क दुचाकीवरून गारठ्याची तमा न बाळगता चिखलीला आले, ही घटना ह्या कार्यक्रमाची यशस्विता वर्णन करण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होण्याचा सन्मान त्यांनाच देण्यात आला, हे ओघानेच आलं!प्रत्येक सदस्याने स्वत:चा परिचय देणे, आणि मनोगत व्यक्त करणे, ही कार्यक्रमाची सुरुवात होती. भारत विद्यालय, बुलडाणा येथे कार्यरत श्री. सिद्धार्थ तायडे सरांनी ‘ व्हाट्सॲप ग्रूपचं स्नेहमिलन ‘ हे वैशिष्ट्य अधोरेखित केलं. जि. प. हायस्कूल, धाड चे शिक्षक श्री. शामभाऊ वाघ यांनी विविध फुलझाडे लावून ती फुलवणाऱ्या ‘ माळ्याची ‘ उपमा ग्रूप ॲडमिन भाऊंना दिली.ग्रूप मेंबर आणि जि. प. हायस्कूलमध्ये कार्यरत शिक्षक श्री. राजूभाऊ खेडेकर सर, भाऊंचे डी. एड. मधील वर्गमित्र आणि औरंगाबाद येथील रूममेट कोविड योद्धा सुजीत हिवाळे ‘ माऊली ‘ यांनी भाऊंना मिश्किल ‘ चिमटे आणि गालगुच्चे ‘ घेतले!सदस्यांच्या परिचय आणि मनोगतानंतर सत्कार मूर्ती ‘ कौन बनेगा करोड़पती ‘ फेम श्री. अमितजी चोपडा यांचा पुष्पगुच्छ, उपरणे, टोपी, शाल आणि श्रीफळ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. अमितजी चोपडा यांनी हॉट सीटपर्यंत पोहोचण्याचे टप्पे उलगडून दाखवले. ग्रूपमधील इतरही सदस्यांनी तिथपर्यंत पोहोचावे, अशी तळमळ व्यक्त केली.
या ग्रंड मस्ती व्हॉटसअप ग्रुप ने आयोजीत केलेल्या गेटटुगेदर कार्यक्रमाची माहीती मीळाल्यावर भुसावळ येथे कार्यरत असलेले पोलिस आधिकारी प्रताप इंगळे यांनी अचानक या मेळाव्याला भेट दिली त्यांनी ग्रुप अडमीन भाउ व सर्व सदस्याचे अभिनंदन केले.त्यांना सुध्दा अडमीन भाउंनी ग्रुप मध्ये सामील करून स्वागत केले.26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात लक्षणीय कार्य करणारे आणि सद्ध्या अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत एन एस जी कमांडो, ग्रूप मेंबर श्री. संजयजी वाघोदे यांनी किशोर कुमार यांचे गीत गाऊन सर्वांना अवीट आनंदाची अनुभूती दिली.शेवटी सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.यापुढील गेट टुगेदर लवकरच सातपुडा पर्वतराजीच्या कुशीत भिंगारा येथे आयोजित करण्याची तयारी श्री. शरद जाधव सर, श्री. भिमराव वानखेडे सर आणि श्री. अतुल देशपांडे सरांनी दर्शवली. त्यामुळे ग्रूप सदस्य आनंदाने ‘ मोह ‘ रले! एक आगळीवेगळी सकारात्मक ऊर्जा घेऊन, अतूट मैत्रीचा लाईफटाईम व्हॅलिडिटी रिचार्ज करून, तृप्त आणि भारावलेल्या मनाने सर्व सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला, आपापल्या विश्वात परतण्यासाठी!