वाशीम : समाजभान जपणार्‍या पत्रकारांमुळे समाजस्वास्थ्य टिकून आहे. पत्रकारिता हे समाज घडविणारे माध्यम आहे, असे भाष्य ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांनी दि.६ जानेवारी रोजी पञकारदिनी केले आहे.स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


सदर कार्यक्रमाह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमतचे अकोला आवृत्ती संपादक किरण अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.उमेदीच्या काळात आपणही पत्रकारिता केली असल्याचे सांगून पद्मश्री कांबळे पुढे म्हणाले, की सरकार दरबारी पत्रकारांचा मोठा वट असतो. लोकशाही सृदृृढ राखण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते. वाशीमला पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. आपल्या वाङ मयीन कारकिर्दीमध्ये पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य असून त्यांचा मी ॠणात आहे, असेही पद्मश्री कांबळे यांनी नमूद केले.पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी एका हिंदी कवितेच्या ओळींतून पत्रकारांचे मोठेपण मांडले. भारतीय वृत्तपत्रसृष्टीच्या देदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकून त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याची प्रशंसा केली. पत्रकार भवनाचे मोठे काम झाल्याचे सांगत, पत्रकारांना शासनस्तरावर येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी खडसे म्हणाले.संपादक किरण अग्रवाल यांनी माध्यम क्षेत्रातील स्थित्यंतरे विशद करीत सुरेख मागोवा घेतला. अत्यंत तरल, संवेदनशील तेवढेच परखड विश्लेषण करून अग्रवाल यांनी पत्रकारितेतील आजच्या स्थिती गतीवर मर्मग्राही भाष्य केले.अध्यक्षीय भाषणात माधवराव अंभोरे म्हणाले, पत्रकारिता करतांना तडजोड नको. बातमीची शहानिशा व्हावी. आपल्या हातून कुणाचे नुकसान व्हायला नको. आपल्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी जशी लेखणी झिजवली, त्यांचा आदर्श घेत आपण पत्रकारिता करावी. पत्रकारांनी आपल्या बातमीची शुद्धता तपासून घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले. शिखरचंद बागरेचा यांनी प्रास्ताविक केले. नीलेश सोमाणी यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *