सांगली : आष्टा येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचलित मा .कै .गोविंदराव लिमये प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक * मा .श्री. स्वानंद सदानंद लिमये यांचे हस्ते करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संस्थेच्या संस्थापिका स्नेहा लिमये व अनुजा लिमये यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले . तसेच प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री वासुदेव मायदेव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे पाळणा गीत गाऊन उपस्थित पाहुणे, विद्यार्थी , पालक यांना मंत्रमुग्ध केले. विविध इयत्तांतील विद्यार्थी शिवकालीन इतिहासातील विविध स्वराज्यनिष्ठ मावळे ,सरदार , यांच्या वेशभूषेत शाळेत उपस्थित होते. या सर्वांमध्ये इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील पोशाखात सादर केलेली भूमीका ,अभिनय व संवाद सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. या कार्यक्रमावेळी ‘शिवरायांचे आठवावे रूप.’..या प्रेरणामंत्राचे सामुदायिक गायन झाले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राची माहिती सांगणारी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा व आपले उज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी ,शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पारधी , शाळेतील सहाय्यक शिक्षक ,शिक्षिका, विविध इयत्तांचे पालक , कर्मचारी उपस्थित होते .