उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळामध्ये उस्मानाबाद जिल्हयाचे तीन जावई आहेत. चार पैकी तीन आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. तरी देखील उस्मानाबाद जिल्हा दुर्लक्षीत असल्याची खंत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान बोलतांना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधान सभेत व्यक्त केली. सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने एक रुपयाचीही तरतुद केलेली नाही. केंद्र सरकारने ३२ कोटी दिले आहेत.
राज्य सरकारने देखील समप्रमाणातील वाटा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. राज्यातील १८ जिल्हयात नविन महिला रुग्णालय व नवजात शिशु रुग्णालयाची घोषणा झाली. काही रुग्णालयाच्या श्रेणीवर्धणाची घोषणा झाली. परंतू यात उस्मानाबादचा उल्लेख नाही. उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयाची क्षमता ६० खाटांची असुन १५० हुन अधिक रुग्ण उपचार घेत असतात. रुग्णांवर जमिनीवर गादी टाकुन उपचार केले जातात, त्यामुळे २०० खाटांच्या रुग्णालयाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी देखील पाटील यांनी विधानसभेत केली आहे.
प्रतिनिधी (आयुब शेख )