लातूर : मराठवाड्यातल्या जैविक शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना जैविक शेती करणाऱ्या शेतक-यांना 50 हजार रुपया पर्यंतचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत बोलताना लातुर आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जैविक शेतीकडे सरकारचे लक्ष वेधले. मराठवाड्यात तूर, मूग, उडीद, करडी, सूर्यफूल, सोयाबीन अश्या पिकांचं प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. ही पिकं थेट खाद्य पदार्थांशी निगडित आहेत, त्यामुळे ही पिकं जैविक पद्धतीने पिकवली जावेत, त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असा प्रश्न शृंगारे यांनी उपस्थित केला. त्यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना, जैविक म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपया पर्यंतचे अनुदान केंद्र सरकार देत असल्याची माहिती दिली आहे. हे अनुदान देत असताना 31 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात तर उर्वरित 19 हजार रुपये प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर दिले जातात. जैविक उत्पादनासाठी बाजारपेठही उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतकरी गटांची स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे खासदार सुधाकर शृंगारे यांनी जैविक शेती मध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि बाजारपेठेची गरज असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. खासदार सुधाकर शृंगारे यांनी मराठवाड्यातल्या जैविक शेतीकडे सरकारच लक्ष वेधल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे.
प्रतिनिधी मोमीन हारून लातूर