भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाचा उपक्रम,थ्रीडी विज्युअल मॉडेलचा घेतला अनुभव
उस्मानाबाद : उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तारांगण उपक्रमांतर्गत आकाशगंगा पाहण्यासाठी ‘पोलाद स्टील’ कंपनीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या प्लॕनेटोरियम म्हणजेच कृत्रिम “आकाशगंगा” चे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या प्रयत्नातून दाखविण्यात आले. दहा लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रशालेमध्ये एक दिवस सेटअप लावण्यात आले होते तर कंपनीचे समीर करीशेट्टी यांनी प्रशालेतील चारशे विद्यार्थ्यांना या मॉडेल चे ऑडिओ व्हिडिओ विज्युअल थ्रीडीच्या माध्यमातून अवकाशात होणाऱ्या सर्व बदलाची माहिती दिली.


तारांगण, सूर्यमाला ,नऊ ग्रहांची माहिती, ग्रहांची सद्यस्थिती, आकाशगंगेत होणारे स्थित्यंतरे, चंद्र व चंद्राच्या कला ,पहिल्या चंद्र मोहिमेचे प्रात्यक्षिक इत्यादी विज्ञान व गणित विषयाचे प्रत्यक्ष नॉलेज आणि त्यावर आधारित माहिती दिवसभर विद्यार्थ्यांना घेता आली.भूगोल आणि विज्ञान विषयाचा हा संपूर्ण डेटा विद्यार्थ्यांनी पाहिला व प्रत्यक्ष अनुभवला.भविष्यात मुलांना याचा उपयोग इसरो व नासामध्ये जाण्यासाठी व वैज्ञानिक होण्यासाठी खूप उपयोगी पडणार असे प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले. विज्ञान विषयाचे शिक्षणातील महत्व पाहता अशा प्रकारचे माॕडेल तालुक्याच्या ठिकाणी किमान एका शाळेत असणे गरजेचे आहे कारण विज्ञान व भूगोल हे विषय प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना शिकवले तर चांगल्या प्रकारे मुलांना समजतात असेही मत मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी या तारांगण उपक्रमातून प्रत्यक्ष ऍस्ट्रॉनॉमीची माहिती अनुभवण्याचा अनोखा आनंद द्विगुणीत केला. या उपक्रमाची माहिती देण्याचे काम शाळेतील विज्ञान शिक्षक बशीर शेख, ममता गायकवाड, सरिता उपासे, संजय रूपाजी, क्रीडा शिक्षक बाबासाहेब जाधव ,धनराज तेलंग, चंद्रशेखर पाटील, सोनाली मुसळे, शिल्पा चंदनशिवे आधी शिक्षकांनी केले.
(सचिन बिद्री)