उस्मानाबाद : बदल हा निसर्गाचा नियम आहे.या बदलाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकात नवीन शैक्षणिक धोरण येऊ लागले आहेत. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर बदलांचा स्वीकार करावा. महाविद्यालयाने गेल्या सहा दशकानंतर नॅक ए ग्रेडचे मानांकन प्राप्त करून यशाचा एक टप्पा पूर्ण केला आहे. आता महाविद्यालयाने ‘स्वायत्त’ महाविद्यालयाचा दर्जा स्वीकारून मराठवाड्यात एक नवीन आदर्श निर्माण करावा. असे आव्हान महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी आर माने यांनी केले.

दि 16 रोजी उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन कौन्सिल बेंगलोर द्वारा महाविद्यालयास ए ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे आणि सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व टीम यांचे अभिनंदन करताना डॉक्टर माने बोलत होते.

या भेटीमध्ये ‘नवीन शैक्षणिक धोरण- संस्था- महाविद्यालय- प्राध्यापक आणि स्टाफ यांची भूमिका’ या विषयावर डॉ माने यांनी मार्गदर्शन करताना संस्था आणि महाविद्यालयाचे कर्मचारी आणि प्राध्यापक हे बदल घडवू शकतात. केवळ मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील बदल स्वीकारून आपल्या स्वतःच्या ज्ञानाला अपडेट करणे आणि भविष्यातील संधीचा शोध घेणे, नाविन्य संकल्पना राबवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी आदींची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी याच्या शंकांचे आणि समस्यांचे मार्गदर्शन करून निवारण केल. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय अस्वले, डॉक्टर विलास इंगळे, डॉक्टर डी व्ही थोरे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.