मागेल त्याला माफक दरात झेंडा उपलब्ध करून देणार-जिल्हाधिकारी नयना गुंडे
गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. मागेल त्याला तिरंगा उपलब्ध करून देण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घर, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपंचायत कार्यालयावर तिरंगा डौलाने फडकविला जाणार आहे. यासाठी महिला बचत गट व उमेदकडे झेंडे पुरविण्याची मागणी नोंदविली आहे. झेंडा नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा राष्ट्र ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व महावितरणचे अधीक्षक अभियंता शरद वानखेडे उपस्थित होते. हर घर झेंडा, कोविड लसीकरण अमृत महोत्सव, उज्वल भारत, उज्वल भविष्य पवर @२०४७ या कार्यक्रमाची आज सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागासाठी २ लाख ९१ हजार तर शहरी भागासाठी २५ हजार झेंडे लागणार आहेत. घरावर झेंडा लावणे ऐच्छिक असले तरी देशाभिमानासाठी नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्र ध्वज तिरंगा लावावा असे आवाहनही त्यांनी केले.याशिवाय सामाजिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठान, शिक्षण संस्था सेवाभावी नागरिक यांना झेंडे विकत घेऊन नागरिकांना वितरित करण्याची इच्छा असल्यास प्रशासन सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन द्यावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला बचत गट, प्रत्येक स्वस्त धान्य दुकान, नगरपालिका व जिल्हा परिषद येथील पलाश केंद्रात झेंडे माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तिरंगा फडकवीत असतांना काय करावे
राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी, राष्ट्रीय ध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क खादी कापडापासून बनविलेला असावा, राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयाताकृती असेल झेंडयांची लांबी व रूंदी 3:2 फूट प्रमाणात राहिल, जेथे ध्वज उघडयावर प्रदर्शित केला जातो त्याठीकाणी हवामान कसेही असले तरी ध्वज सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत फडकविला जाईल, राष्ट्रीय ध्वज फडकविताना केशरी रंग वर आकाशाकडे असावा व हिरवा रंग जमीनीच्या दिशेने खाली असावा, राष्ट्रीय ध्वज फडकविताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. मध्यभागी वा खाली लावू नये, ध्वज चढवताना लवकर चढवावा व उतरवताना सावकाश उतरावा.
काय करू नये
ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर लिहलेले नसावे, ध्वज जाणुनबुजून जमीनीवर अथवा पाण्यामध्ये बुडणार नाही अश्या पध्दतीने लावावा, राष्ट्रीय ध्वजाचा उपयोग इमारत झाकण्यासाठी करता येणार नाही, राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही, खराब झालेला, फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाणार नाही, ध्वजाचा वापर सजावटीसाठी केला जावू नये, तिरंगाच्या ध्वजस्तंभावर अन्य कोणताही ध्वज लावता येणार नाही, तसेच त्याच्या उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही, यावर Flag Code of India च्या तरतूदी लागू राहतील, ध्वजाचा अवमान करणाऱ्यास तिन वर्षापर्यंतची कैद वा आर्थीक दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा देण्याची कायदयात तरतूद आहे, याची जाणीव घ्यावी असे त्यांनी सांगितले.