इमारत बांधकामावर कोट्यवधी उधळूनही परिस्थिती काही केल्या सुधारेना…
गोंदिया : तालुका देवरी! कोट्यवधीचे बजेट!! भूमिपूजन सोहळाही तसा शाहीच!!! मात्र इमारत तयार झाल्यावर परिस्थिती मात्र जूनीच. हे वास्तव आहे, देवरी तहसील कार्यालयाचे. शेवटी कोट्यवधीचा निधी खर्चून ही इमारत गळत असेल, तर हा पैसा जातो तरी कोठे, हे या तालुक्यातील गरीब जनतेस पडलेले कोडेच म्हणावे लागेल.
केवळ तालुका कार्यालयाचेच हे हाल आहेत असे पण नाही. तालुका भूमीअभिलेख कार्यालयाचे हाल सुद्धा यापेक्षा वेगळे नाही. जेथे नागरिकांच्या जमिनीचे रेकॉर्ड जतन करून ठेवायचे असतात, त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तर पावसाळा लागला की धस्स होते. अभिलेखागारात पाणी गळत असल्याने चक्क कार्यालयातच डबके साचत असते. वारंवार वृत्त प्रकाशित करूनही वरिष्ठ दखल घेत नसल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी भागातील नागरिकांचे भवितव्य किती सुरक्षित आहे, याची कल्पना येते.
यापूर्वी सुद्धा तालुका कार्यालयाची इमारत होती. त्या इमारतीवर अनेक वेळा दुरुस्तीच्या नावावर लाखोचा खर्च झाला. पण परिस्थिती मात्र बदलत नव्हती. शेवटी आपल्या प्रशासनाने नवी शक्कल लढवून नवीन इस्टिमेट शासन दरबारी मांडून तो मंजूर करवून सुद्धा घेतला. माननीय मंत्री महोदयाला आमंत्रित करून भूमिपूजन देखील थाटात पार पाडले. इमारत तयार सुद्धा झाली. पण पहिल्याच पावसाने या इमारतीचे वास्तव समोर आणले. किती मोठा
गोलमाल या बांधकामात झाला, याचे चित्रण पावसाच्या पाण्याने जनतेसमोर मांडले. या कार्यालयात नागरिकांच्या अनेक दस्तांचे जनत केले जाते. मात्र, या बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेमुळे अनेकांचे अभिलेख पावसाने चक्क धुवून काढले. परिणामी, अनेक गावातील नागरिकांचे दस्त आता उपलब्धचे होत नाही. अनेक दस्त तर वाळवीच्या नावावर फस्त करण्यात आले. तहसील कार्यालयात नोंदणी कार्यालय, सभा हॉल, सेतु कार्यालय अशा अनेक विभात गळती सुरू आहे. विशेषतः तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात व तहसीलदारांचा प्रवेश द्वारातच पाणी साचलेले आहे. देवरी तहसील कार्यालयाला गळती लागल्याने येथील रेकॉर्ड सांभाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या बैठकीची जागा सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात वारंवार बदलावी लागत आहे.
अशीच काहीशी अवस्था अवळपास अनेक कार्यालयाची आहे. परिणामी, आदिवासी शिवाय नक्षलग्रस्त असा शिक्का लागलेल्या तालुक्यातील जनतेची ऐकतोच कोण. पुढारी आपली ढेरी वाढविण्यात खुश. मरण मात्र गरीब जनतेचा.