पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यासप्रशासकीय मान्यता देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचना, खासदार हेमंत पाटील यांची माहिती.
हिंगोली / नांदेड जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा प्रकल्पाअंतर्गत व सिद्धेश्वर धरणाखाली येणाऱ्या तीन उच्च पातळी बंधाऱ्याना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा अनुशेष भरून निघावा याकरिता खासदार हेमंत पाटील मागील अनेक दिवसापासून सातत्याने मागणी करत आहेत. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सुद्धा यासंदर्भाने भेट घेतली होती. हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या पूर्णा नदीवर पूर्णा प्रकल्पा अंतर्गत तसेच सिद्धेश्वर धरणाखाली येणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा ता. वसमत तालुक्यातील जोड परळी आणि पिंपळगाव कुटे या तीन उच्च पातळी बंधाऱ्याना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे याकरिता मागणी केली होती. त्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळून बराच कालावधी उलटून गेला असतांना देखील अद्याप पर्यंत यास आवश्यक असणारी प्रशासकीय मान्यता मात्र शासन दरबारी प्रलंबित होती. तसेच निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर श्री शिंदे यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. याबाबत रीतसर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देखील खासदार हेमंत पाटील यांनी पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे
वरील तीन उच्च पातळी बंधाऱ्याना प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध झाल्यास हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत होणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे.