जलसंपदा विभागाशी चर्चा करून धरणातून पाणी सोडण्यापूर्वीस सर्वतोपरी दक्षता घेण्याच्या सूचना
नदीकाठच्या गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर यांनी सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन

लातूर –मराठवाड्यातील लातूरसह तीन जिल्ह्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या मांजरा नदीवरील कळंब तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण ९४ टक्के भरले आहे. त्याचबरोबर तेरणा नदीवरील माकणी येथील निम्नतेरणा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. सलग तिसऱ्या वर्षात जवळपास सर्वच धरणे, तलाव, बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरली आहेत ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे, असे म्हणत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. सदयाची परिस्थिती पाहता मान्सूनच्या परतीचा पाऊस आणखी काही दिवस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
.

यामुळे धरणात येणारा पाण्याचा ओघ पूढेही काही दिवस सुरूच राहील असा अंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मांजरा धरणाचे दरवाजे उघडून खाली नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊ शकते. या संदर्भाने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा करून धरणातून पाणी सोडण्यापूर्वी सर्वतोपरी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही खबरदारीच्या उपायोजना आखाव्यात अशा सुचना केल्या आहेत.

निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता मांजरा धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरीक, शेतकरी, शेतमजूर यांनी सावधगिरी बाळगावी. कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीमाल, पशुधन, शेती अवजारे सुरक्षित स्थळी नेऊन ठेवावीत, नदीपात्रात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही प्रकारची धाडसी कृती करू नये असे आवाहन देखील राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529